2–3 minutes

नवी मुंबई (प्रतिनिधी) : लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी आज (21 ऑगस्ट रोजी) पाणीटंचाई आणि विजेच्या समस्या या दोन नवी मुंबईच्या जिव्हाळ्याच्या विषयांवर महापालिका आणि महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये लोकनेते आमदार नाईक यांनी अत्यंत आक्रमकपणे अधिकाऱ्यांना सुचित केले की शहरातील विजेच्या समस्या लवकरात लवकर मार्गी लावा तसेच पाणीपुरवठा सुरळीत करावा. संबंधित अधिकाऱ्यांनी या अनुषंगाने कार्यवाही करण्याचे बैठकीत मान्य केले.

या बैठकीला माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक,माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, माजी सभागृह नेते रवींद्र इथापे, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, माजी भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत,  माजी सभापती डॉक्टर जयाजी नाथ, स्थायी समितीच्या माजी सभापती शुभांगी पाटील, माजी नगरसेवक सुरज पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते. महावितरणच्या वतीने अधीक्षक अभियंता सिंहजी गायकवाड आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी तसेच महापालिकेच्या वतीने अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील आणि त्यांचे वरिष्ठ सहकारी अधिकारी त्यांच्याशी संबंधित दोन स्वतंत्र बैठकांना उपस्थित होते.

नवी मुंबई शहरामध्ये अनेक ठिकाणी विजेची उपकरणे नादुरुस्त झालेली आहे. अनेक भागात उघड्या डीपी आहेत. धोकादायक पद्धतीने उच्च दाबाच्या वीजवाहिन्या वरून गेल्या आहेत. केबल जळण्याचे प्रकार वारंवार घडतात. वरचेवर वीज पुरवठा खंडित होतो आहे. या सर्वांचा त्रास नागरिकांना होत असून अपघात घडत आहेत. लोकनेते आमदार नाईक यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना या समस्या सोडविण्यासाठी सूचित केले. महावितरणच्या बैठकीमध्ये उपस्थित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी उत्सव स्थळी वीज जोडणी मिळवण्यात येणाऱ्या अडचणींविषयी माहिती दिली. त्यावर सर्व गणेशोत्सव मंडळांना तत्परतेने वीज जोडणी देण्यात यावी. वीज मंडळांना वीज जोडणी देताना निवासी दर लावू नयेत. सवलतीच्या दरामध्ये विजेची जोडणी द्यावी, असे निर्देश लोकनेते आमदार नाईक यांनी दिले असता अधीक्षक अभियंता गायकवाड यांनी सर्व प्रकारची कायदेशीर पूर्तता असल्यास 48 तासात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना वीज जोडणी देण्यात येईल, असे सांगितले. वाढीव वीज बिलांवर फेरविचार करण्यात येईल, असेही ते म्हणाले.‌ वारंवार वीज खंडित होण्याच्या समस्यांचा अभ्यास करून त्या त्या ठिकाणचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे. महावितरणच्या वतीने शासनाकडे नवी मुंबईतील वीज सुधारणांसाठी सव्वातीनशे कोटी रुपयांची मागणी करण्यात आलेली आहे.

नवी मुंबईमध्ये महापालिका प्रशासकीय कालावधीमध्ये पाणीटंचाईची समस्या संपूर्ण शहरभर गंभीर बनली आहे. लोकनेते आमदार नाईक यांनी ही बाब नियमित महापालिका बैठकांमधून महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे. प्रशासकीय कालावधीमध्ये महापालिकेच्या जलवाहिन्यांवरून अन्य घटकांना बेकायदा पाणी देण्यात येते. एमआयडीसीने नवी मुंबईच्या कोट्याचे पाणी कमी केले आहे, अशी माहिती देऊन लोकनेते आमदार नाईक यांनी कोणाच्या सांगण्यावरून नवी मुंबईच्या हक्काचे पाणी कपात करण्यात आले  याबद्दल पालिका प्रशासनाने चौकशी करावी, अशी मागणी केली. 

नवी मुंबईचा हक्काचे पाणी नवी मुंबईला मिळाले पाहिजे याविषयी पालिका प्रशासनाने एमआयडीसीकडे मागणी करावी. पाणी वितरणामध्ये त्रुटी आहेत. नागरिकांना पाणीटंचाईमुळे नाईलाज म्हणून टँकरने पाणीपुरवठा घ्यावा लागतो. त्यामुळे त्यांना आर्थिक फटका बसतो.  पालिका प्रशासनाच्या गलथानपणामुळे पाणीटंचाई निर्माण झालेली असली तरी जनतेचा रोष मात्र लोकप्रतिनिधींवर येतो,‌ असे स्पष्ट करत लोकनेते आमदार नाईक यांनी जनतेचा उद्रेक होण्याअगोदर पाणीपुरवठा सुरळीत करा, अशी सूचना पालिकेच्या अधिकाऱ्यांना केली. त्या दृष्टीने तातडीने पावले उचलण्याची ग्वाही, पालिका अधिकाऱ्यांनी दिली.


Design a site like this with WordPress.com
Get started