1–2 minutes

मुंबई (पालिका प्रशासन) : लोकमान्य टिळक यांच्या ‘केसरी’चा आदर्श समोर ठेवून आणि सनातन हिंदु धर्माचा विचार अग्रस्थानी ठेवून राष्ट्र आणि धर्म जागृतीचे कार्य सनातन प्रभातच्या माध्यमातून अविरतपणे चालू आहे. कुठलाही उद्योजक, राजकीय पक्ष यांचा पाठिंबा नसतांना केवळ भगवंताच्या कृपेने सनातन प्रभात वृत्तसमूहामधील एक महत्त्वाचा भाग असलेल्या ‘मराठी साप्ताहिक सनातन प्रभात’ने यंदा 25 व्या वर्षात पदार्पण केले आहे. या निमित्ताने शनिवार, 19 ऑगस्ट 2023 या दिवशी सायं 6 वा. लक्ष्मीनारायण बाग, तळ मजला, बाळ गोविंददास रोड, यशवंत नाट्यगृहाच्या बाजूला, बॉम्बे ग्लास हाऊसच्या बाजूला माटुंगा (प.) येथे ‘साप्ताहिक सनातन प्रभात’च्या रौप्य महोत्सवी वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय उराशी बाळगून मार्गक्रमण करत आहेत. या ध्येयाला अर्थात् हिंदु राष्ट्रविषयक चळवळींना वैचारिक बळ पुरवणे तसेच याला प्रसिद्धी देऊन हिंदु राष्ट्राचा विचार जनसामान्यांपर्यंत पोचवण्यामध्ये सनातन प्रभातचे विशेष योगदान आहे. रौप्य महोत्सवी ‘साप्ताहिक सनातन प्रभात’च्या वर्धापनदिन सोहळ्याच्या या कार्यक्रमात ज्येष्ठ लेखक आणि व्याख्याते दुर्गेश परुळकर, सनातन संस्थेच्या प्रवक्त्या नयना भगत आणि सनातन प्रभातच्या उपसंपादिका रुपाली वर्तक हे वक्ते मार्गदर्शन करतील. ‘सनातन प्रभात’ची वैशिष्टये सांगणारा विडिओ यावेळी दाखवण्यात येईल तसेच सनातन प्रभातचे काही वाचक आपले मनोगतही व्यक्त करतील.

‘सनातन प्रभात’ कक्ष, धर्म, अध्यात्म, साधना, बालसंस्कार, आचारधर्म, आयुर्वेद, प्रथमोपचार, स्वसंरक्षण, हिंदु राष्ट्र आदी विविध विषयांवरील ग्रंथप्रदर्शन, राष्ट्र-धर्म विषयक फलकप्रदर्शनही लावण्यात येणार आहे. तरी सनातन प्रभातचे वाचक, हितचिंतक, सर्व राष्ट्र आणि धर्मप्रेमी हिंदूंनी सहकुटुंब उपस्थित राहून या अमूल्य पर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूहाच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9892702655 यावर संपर्क साधावा, असे ‘सनातन प्रभात’च्या वतीने काढण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात कळवले आहे.


Design a site like this with WordPress.com
Get started