2–3 minutes

फोटोग्राफीक सोसायटी ऑफ इंडियाच्या नवी मुंबईतील छायाचित्र प्रदर्शनाचे उध्दव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई (प्रतिनिधी/ पालिक प्रशासन) : “फोटोग्राफी ही एक कला आहे आणि कला ही रक्तात असावी लागते. आपण कलाकृती विकत घेऊ शकतो, पण कला विकत घेऊ शकत नाही. आमच्याकडील काही कलाकृती काही जणांनी विकत घेतल्या, मात्र कलाकार जागेवर असल्याने आम्हाला कलाकृती विकत घेण्याचा प्रश्नच पडला नाही. नवीन कलाकृती निर्माण करण्याची हिंमत आमच्यात आहे,” असे जोरदार फटकारे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी गद्दारांना आणि त्यांच्या पाठीराख्यांना आज (29 जुलै रोजी) लगावले. द फोटोग्राफीक सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने वाशी येथील भारतीय विद्या भवनच्याकेंद्रात भरवण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

फोटोग्राफीक सोसायटी ऑफ इंडिया आणि भारतीय विद्या भवन यांच्या संयुक्त विद्यमानाने वाशी येथील सेक्टर ३० मधील भारतीय विद्या भवनच्या केंद्रात २१ व्या आंतरराष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात ४३ देशामधील २१९ छायाचित्रकारांनी टिपलेली निवडक ७६ छायाचित्र ठेवण्यात आली आहे. या छायाचित्रांची निवडक दोन हजार ३०० छायाचित्रांमधून करण्यात आली आहे. या आंतरराष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन आज सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थितींना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, माझा उल्लेख या ठिकाणी माजी मुख्यमंत्री म्हणून केला आहे. मी जरी माजी मुख्यमंत्री असलो तरी माजी फोटोग्राफर कधीच होणार नाही. कलेचा वारसा मला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून मिळाला आहे. आज या ठिकाणी आल्यामुळे मला बर्‍याच दिवसातून माहेरची माणसे भेटल्यासारखी वाटतात. सध्या जे काय चालले आहे, ते मोठे विपरीत आहे. कोणाचा फोटो कोणाबरोबर कधी येईल आणि फोटोमधील एखादा माणूस कधी गायब होईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे थोडा काळ मी फोटोग्राफी थांबवली आहे, अशीही कोपरखिळी यावेळी उध्दव ठाकरे यांनी मारली.

याप्रसंगी शिवसेना नेते सुभाष देसाई, चित्रपट दिग्दर्शक संदीप पाटील, सोसायटीचे चेअरमन एम. एन. रामचंद्रन, अध्यक्ष अनंद निरगुडे, सुनिल व्यास, राजेंद्र वाघमारे, शशांक नरसाळे, शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे आदी उपस्थित होते.

क्षण गोठवून ठेवण्याची ताकद फोटोग्राफीमध्ये

क्षण हे जात असतात, आनेवाला कल जानेवाला है, पण हाच कल गोठवून ठेवण्याची ताकद फोटोग्राफीमध्ये आहे. फोटोग्राफीच्या माध्यमातून हे क्षण आपण पाहिजे तेंव्हा जिवंत करू शकतो आणि त्या काळात जाऊ शकतो. त्या काळात जे लोक असतील त्यांना आठवणीतून भेटू शकतो. ही कमाल फक्त फोटोग्राफीचीच आहे, असेही उध्दव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

जगभरातील छायाचित्रकारांचा समावशे ही गौरवास्पद बाब

फोटोग्राफीक सोसायटी ऑफ इंडिया म्हणजेच पीएसआयने घेतलेल्या स्पर्धेत जगभरातील छायाचित्रकार सहभागी झाले आहेत. म्हणजेच फोटोग्राफी देशांच्या सीमारेषा पार करून पुढे गेली, ही बाब गौरवास्पद आहे. या प्रदर्शनात यापुढे माझे दोन छायाचित्र दिसणार आहेत, हा माझा बहुमान आहे, असेही गौरवोदगार उध्दव ठाकरे यांनी यावेळी काढले.

मानद सदस्यत्व बाहल

फोटोग्राफीक सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने उध्दव ठाकरे यांना मानद सदस्यत्व देऊन गौरवण्यात आले. हा गौरव सोसायटीचे चेअरमन एम. एन. रामचंद्रन यांच्या हस्ते करण्यात आला. छायाचित्र प्रदर्शनात ठेवलेल्या सर्वच छायाचित्रांचे उध्दव ठाकरे यांनी बारकाईने निरीक्षण केले आणि हे छायाचित्र कुठे टिपले याबाबत माहिती करून घेतली.


Design a site like this with WordPress.com
Get started