प्रतिनिधी (Palika Prashasan) : नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे 24 वा कारगिल विजय दिवस आज बुधवार दिनांक 26 जुलै रोजी साजरा करण्यात आला. कारगिल युद्धामध्ये शहीद जवानांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली.
भारतीय जनता पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमास माजी नगरसेवक केशव म्हात्रे माजी नगरसेवक शंकर मोरे माजी नगरसेवक लीलाधर नाईक, समाजसेवक दाजी सणस समाजसेवक नारायण शिंदे समाजसेवक संदीप म्हात्रे समाजसेवक रॉबिन मढवी समाजसेवक सुनिकेत हांडे-पाटील, माजी सैनिक सर्वश्री सुहास मुळे अंकुश बढे विजय मोरे देवानंद पाटील, प्राचार्य प्रताप महाडिक, समन्वयक नरेंद्र म्हात्रे, मुख्याध्यापक रवींद्र पाटील, एनसीसी आणि एनएसएसचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आपले विचार व्यक्त करताना जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी कारगिलचा विजय देशवासीयांसाठी अभिमानास्पद असल्याचे म्हंटले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या सैन्याने पाकिस्तान विरुद्धचे युद्ध जिंकले आणि त्यांना त्यांच्या भूप्रदेशातून खदेडले. तत्कालीन पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांनी अत्यंत कणखर निर्णय घेऊन आपल्या शूर सैन्याच्या माध्यमातून ऑपरेशन विजय मोहीम आरंभली. हे युद्ध जिंकण्यासाठी शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून तरुणांनी आणि विद्यार्थ्यांनी सैनिकांपासून प्रेरणा घेऊन देशासाठी योगदान देण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी यावेळी केले.
निवृत्त सैनिक देवानंद पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सैनिक आपलं कर्तव्य पार पडत असतो. तो कर्तव्याचे उदात्तीकरण करत नाही. नागरिकांच्या मनात सैनिका बद्दल आदरभाव असणं हे आमच्यासाठी समाधानाची बाब असल्याचे ते म्हणाले. तर माजी सैनिक विजय मोरे, अंकुश बढे आणि सुहास मुळे या माजी सैनिकांनी एनसीसी कॅडेट आणि युवकांना सैन्यामध्ये भरती होण्याचे आवाहन केले. समीक्षा झाल्टे या कॅडेटने एनसीसीच्या माध्यमातून देशसेवेत योगदान देणे अभिमानास्पद असल्याचे नमूद केले तर संजीवनी कोरडे या कॅडेटने सैन्यामध्ये भरती होण्याची इच्छा व्यक्त करून कारगिल विजय दिवस सारख्या समारंभातून प्रेरणा मिळते असे सांगितले
