प्रतिनिधी (पालिका प्रशासन) : भारतीय जनता पार्टीला जनमानसात गतिमानतेने प्रसिध्दी मिळवून देऊन, पक्ष समर्थक व मतदार निर्माण करण्याची महत्वाची भूमिका बजावणाऱ्या पत्रकारांवर, नवी मुंबई भाजपचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष संदीप नाईक नाराज असल्याचे त्यांच्या कृतीतून निदर्शनास पडत आहे.
ऐरोली विधानसभेचे प्रथम आमदार तसेच महानगरपालिकेतील माजी स्थायी समिती सभापती म्हणून एकेकाळी कार्यकाळ गाजवणारे आणि शहरातील प्रत्येक सामाजिक घटकाची नस ओळखणारे संदीप गणेश नाईक यांची नुकतीच भाजप जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती झाली.
तदनंतर, लगेचच पक्षाचे वरिष्ठ नेते व राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस ‘सेवा दिवस’ म्हणून, जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून शहरातील विविध भागांमध्ये ‘नाईक समर्थक’ नगरसेवकांच्या सहकार्याने साजरा करण्यात आला.
परंतु, या पक्षीय कार्यक्रमांपासून नवी मुंबईतील पत्रकारांना दूर ठेवण्यात आले. तसेच, सदर कार्यक्रमाबाबत आगोदरच पत्रकारांपर्यंत माहिती पोहचू नये याबाबत विशेष काळजी घेण्यात आली. तर, कोरोना लॉकडाऊन काळात पत्रकारांची विशेष काळजी घेऊन अपेक्षेपेक्षा अधिक सहकार्य करणारे, नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी आपल्या पक्षीय सामाजिक उपक्रम सदृश्य कार्यक्रमाच्या वृत्तांकनापासून पत्रकारांना जाणीवपूर्वक दूर ठेवले असल्याची भावना नवी मुंबईतील पत्रकारांमध्ये पसरली आहे. त्यामुळे, नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष संदीप नाईक नवी मुंबईतील पत्रकारांवर नाराज आहेत की काय? अशी चर्चा पत्रकारांमध्ये रंगली आहे.
तर, सत्ताधारी पक्षाचे नवनिर्वाचित पदाधिकारी नियुक्तीनंतर प्रेस काँफेरेन्सच्या माध्यमातून पत्रकरांशी संवाद साधतात व आपली पुढील कामाची भूमिका स्पष्ट करतात. मात्र संदीप नाईक यांनी तेही टाळल्याने पत्रकार अनेक तर्कवितर्क लावत आहेत.

