3–4 minutes

नवी मुंबई (पालिका प्रशासन) : लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी आज (१३ जुलै रोजी) नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याबरोबर नवी मुंबईतील विविध प्रश्नांवर बैठक घेतली. पालिका आयुक्तांबरोबरची आजची त्यांची ७२वी बैठक होती. या बैठकीत लोकनेते नाईक यांनी जनतेची कामे करताना पक्षपात करणाऱ्या अधिकाऱ्यांना इशारा देत त्यांनी आपली वर्तणूक सुधारावी अन्यथा त्यांना घेराव घालू, असा इशारा दिला. आजच्या बैठकीला माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक माजी महापौर सागर नाईक माजी महापौर सुधाकर सोनवणे माजी सभागृहनेते रवींद्र इथापे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत माजी स्थायी समिती सभापती नवीन गवते माजी सभापती डॉक्टर जयाजी नाथ यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.


पावसाळ्यामुळे उद्भवलेल्या समस्यांवर उपाय करावेत…

लोकनेते नाईक यांनी प्रामुख्याने पावसाळा सुरू झाल्यानंतर शहरांमध्ये अनेक भागात पावसाचे पाणी साचले होते याकडे आयुक्तांचे लक्ष वेधले. पावसामुळे उघडलेले खड्डे,  पदपथ आणि गटारांची तातडीने दुरुस्ती करावी. खासकरून उडान पुलावर भुयारी मार्गांच्या वरच्या भागांमध्ये खड्डे पडल्याचे दिसून येते त्याचबरोबर रस्त्यांवर ठिकठिकाणी कचरा आणि रॅबिट जमा झाल्याचे निदर्शनास येते. जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. या पार्श्वभूमीवर कचरा व रॅबिट साफ करा. त्याचबरोबर धोकादायक वृक्षांच्या फांद्या तोडाव्यात, दिघा, तुर्भे सारख्या दरड प्रवन क्षेत्रात राहणाऱ्या रहिवाशांची काळजी घ्यावी, अशा काही मौलिक सूचना त्यांनी केल्या.

पक्षपात करणाऱ्या अधिकाऱ्यांना धडा शिकवू…
लोकप्रतिनिधी नागरी सोयी सुविधांची कामे जनतेसाठी पालिका प्रशासनाला सुचवत असतात. परंतु महापालिकेचे काही अधिकारी जनतेच्या कामात पक्षपात करीत असतात. सज्जन लोकप्रतिनिधींनी  आवश्यक कामे सुचवली असताना देखील मुद्दाम त्यांच्या कामांची प्रकरणे मंजूर करण्यासाठी दिरंगाई केली जाते तर दुसरीकडे काही दबंग लोकप्रतिनिधींची अनावश्यक वारेमाप खर्चाची कामे मात्र वायूच्या वेगाने केली जातात. यासंदर्भात आक्रमक भूमिका घेत लोकनेते आमदार नाईक यांनी अशा पक्षपात करणाऱ्या अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाईची मागणी केली.  अन्यथा या अधिकाऱ्यांना लोकशाही मार्गाने आंदोलन करून घेराव घालण्याचा इशारा दिला. नागरी सुविधांची कामे मंजूर करण्यासाठी काही अधिकारी पैशांची मागणी देखील बिनधास्त करतात ही बाब देखील त्यांनी आयुक्तांच्या माहितीमध्ये आणून दिली.

सिडको आणि एमआयडीसीला इशारा..
महापालिकेने विकास आराखड्यामध्ये आरक्षित केलेले आणि एमआयडीसीने महापालिकेकडे हस्तांतरित केलेले सुविधा भूखंड सिडको आणि एमआयडीसी दोन्ही प्राधिकरणांकडून विकण्यात येत आहेत.  याप्रकरणी लोकनेते आमदार नाईक यांनी  विधानसभेत आवाज उठवला होता. महापालिकेचे सुविधा भूखंड विकले जाऊ नयेत याची खबरदारी घेण्याची जबाबदारी पालिका प्रशासनावर असून पालिका अधिकाऱ्यांनी जागरूकपणे सुविधा भूखंड विक्री थांबवली पाहिजे असे सांगून पालिकेच्या विकलेल्या भूखंडावरील बांधकामांना पालिकेने कम्प्लिशन सर्टिफिकेट देऊ नये, अशी मागणी त्यांनी केली.

आरोग्य व्यवस्था सतर्क ठेवावी…
पावसाळा सुरू झाल्यानंतर डेंग्यू, मलेरिया सारखे साथीचे रोग डोकं वर काढण्याची भीती असते त्यामुळे पालिका प्रशासनाने आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवून आवश्यक औषधांचा साठा करून ठेवावा ,असा सल्ला लोकनेते नाईक यांनी दिला.

झोपडीवासियांना न्याय द्यावा…
महापालिकेच्या वतीने झोपडीधारकांना झोपडपट्टी ओळखपत्र देण्याचे काम सुरू आहे
 शहरामध्ये 43 हजार झोपड्या आहेत. त्यापैकी 19 हजार झोपडीधारकांना ओळखपत्र दिली जाणार आहेत. सुमारे 24000 झोपडीधारक ओळखपत्रापासून वंचित राहणार आहेत. त्यांच्यावर अन्याय नको असे नमूद करत लोकनेते आमदार नाईक यांनी दिघापासून बेलापूर पर्यंत सर्व झोपडपट्ट्यांचे पुन्हा एकदा सर्वेक्षण करून सर्वांना झोपडपट्टी ओळखपत्र देण्याची मागणी केली. या मागणीला आयुक्त नार्वेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी फ्री होल्ड कराव्यात..
प्रकल्पग्रस्तांची सर्व प्रकारची बांधकामे नियमित करून त्यांच्या जमिनी फ्री होल्ड करण्याच्या मागणीचा लोकनेते नाईक यांनी यावेळी पुनरुचार केला. लीज होल्ड चालणार नाही. युनिफाईड डीसीआरचा लाभ प्रकल्पग्रस्तांना देखील झाला पाहिजे त्या दृष्टीने महापालिकेने पावले उचलण्याची सूचना त्यांनी केली.


सेवा रस्त्यांवरील सुरू असलेल्या हॉटेलच्या बांधकामांना नोटीसा धाडाव्यात…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत लोकनेते आमदार नाईक यांच्या झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये नवी मुंबईतील सेवा रस्त्यांवर नवीन हॉटेल बांधकाम करण्यास स्थगिती देण्यात आली आहे असे असताना महापे येथे हॉटेलचे बांधकाम सुरू असल्याचे दिसून येते.  त्या हॉटेलची बांधकामे नोटिसा पाठवून तातडीने थांबवण्याची मागणी लोकनेते आमदार नाईक यांनी केली. सर्विस रोडवर हॉटेलच्या बांधकामांना पालिकेचे काही अधिकारी देखील सहकार्य करीत आहेत. जर ही बांधकामे थांबली नाही तर एमआयडीसीवर धडक मोर्चा काढण्यात येईल.


गढूळ पाणीपुरवठा,पाणीटंचाई दूर करा…

पालिकेच्या प्रशासकीय राजवटीमध्ये पाणीटंचाईची समस्या गंभीर झाली. नवी मुंबईचे स्वतःचे मालकीचे धरण असताना अशाप्रकारे पाण्याची वाणवा असता कामा नये, असे स्पष्ट करून लोकनेते आमदार नाईक यांनी सक्षम पाणीपुरवठा अधिकाऱ्यांकडून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची सूचना केली.‌ त्याचबरोबर सध्या काही ठिकाणी होणारा गढूळ पाण्याचा पुरवठा बंद करण्यासाठी उपाय योजना करण्याची मागणी देखील केली.

महत्त्वाच्या मान्य झालेल्या मागण्या…
ठाणे-बेलापूर मार्गावर तुटलेले दुभाजक दुरुस्त होणार; जुहू गाव येथील शाळेची दुरुस्ती; फोर्टी प्लस भवनचे हस्तांतरण; दिघा येथे टाकले जाणारे डेब्रीज थांबवणार; इलठाण पाडा येथे रस्त्याचे काम हाती घेणार; अनधिकृतपणे उभ्या वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या टपऱ्यांवर कारवाई होणार; पुनर्विकासाकरता दबाव आणण्यासाठी पाणी जोडणी तोडून दबाव आणणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी होणार; कोपरी पाम बीच रोडवर पादचाऱ्यांच्या संरक्षणासाठी संरक्षक भिंत


Design a site like this with WordPress.com
Get started