पनवेल (पालिका प्रशासन) : जागतिक योग दिनानिमित्त आज (२१ जून रोजी) भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या समवेत युवा व ज्येष्ठांनी निसर्गाच्या सानिध्याने भरपूर असलेल्या माची प्रबळगड येथे योगासने केली. यावेळी इन्स्टिट्यूट ऑफ योग अँड आयुर्वेद आणि आरोग्य सेवा समिती पनवेल यांच्यावतीने मार्गदर्शन तसेच प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यावेळी योग केंद्र प्रमुख सूर्यकांत फडके यांनी योग संदर्भात मार्गदर्शन केले. तर योगसाधक अरविंद गोडबोले, नैना म्हात्रे, सारिका शेलार, श्रुती शेलार यांनी योग प्रात्यक्षिके सादर केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून दि.२१ जून २०१५ रोजी पहिला जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. योग साधनेतून मिळणाऱ्या अनन्यसाधारण लाभांमुळे आज योग जगात सर्वत्र लोकप्रिय आहे. भारतीय ऐतिहासिक परंपरेचा अमूल्य ठेवा म्हणजे योग आहे, जो भारताने पूर्ण विश्वाला प्रदान केला. सर्व जग करोनाच्या विळख्यात अडकलेले असताना भारतातील अनेक योग प्रशिक्षकांनी “हे विश्वाची माझे घर” हाच विचार ठेवून सर्व जगामध्ये योग प्रशिक्षण दिले. विशेषत: मानसिक बळ वाढविण्यासाठी याचा उपयोग झाला. श्वसन मार्ग शुद्ध करणारी, फुफ्फुसांना बळकटी देणारी ‘जलनेती’ ही शुद्धीक्रिया करोना काळात सर्वांसाठी लाभदायक ठरली. २१ जून जागतिक योग दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. त्या अनुषंगाने माची प्रबळगड येथे योग्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी आ. प्रशांत ठाकूर, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक हरेश केणी, उत्तर रायगड युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, शहर अध्यक्ष रोहित जगताप, सुभाष पाटील, अमोघ प्रशांत ठाकूर, आदेश परेश ठाकूर, वारदोली ग्रामस्थ, तसेच राकेश भुजबळ, हर्षवर्धन पाटील, सुमित झुंझारराव, अभिषेक भोपी, अक्षया चितळे, तेजस जाधव, अक्षय सिंग, साहिल नाईक, उदित नाईक, ऋषी साबळे, रोहन माने, शुभम कांबळे, अमेय देशमुख, श्रावण घोसाळकर, तेजस जाधव, देवांशू प्रबाळे तसेच युवा व ज्येष्ठ योगा प्रेमींनी योगासने केली.
योगकडे फक्त व्यायाम म्हणून न बघता, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एक जीवनशैली म्हणून त्याच्याकडे पाहिले गेले पाहिजे. दिवसाची सुरुवात प्रार्थनेने करून सूर्यनमस्कार घालणे, विविध प्रकारची आसने करून स्थिरता अनुभविणे, दृढतेसाठी प्राणायाम आणि ध्यान अशा जीवनशैलीमुळे माणसाचा प्रवास मनाच्याही पलीकडे चित्त प्रदेशाकडे होतो. यम नियमातील मानसिक-शारीरिक स्वच्छता, संतोष, तप, स्वतःच्या आचरणाचा अभ्यास करणे आणि ईश्वराचे चिंतन यामुळे मनुष्य आपोआप आध्यात्मिक अनुभूती घेतो. योग हे आपले प्राचीन शास्त्र आहेच, पण त्याचबरोबर आयुर्वेद, युनानी यांचा प्रसार देखील भारत सरकार पूर्ण जगभरात करीत आहे. आंतरराष्ट्रीय योग दिवस सर्वांपर्यंत पोहोचावा, यासाठी भारत सरकार जागतिक योग दिवसाचे महत्व पोहोचवून त्या ठिकाणी हा दिवस साजरा करीत आहे.
मागील काही वर्षांमध्ये झालेल्या योग प्रचाराचा आढावा घेतला असता, योग प्रशिक्षणाची मागणी सर्वत्र वाढत आहे, योग कडे बघण्याचा शास्त्रीय दृष्टीकोन वाढीस चालला आहे. सर्व जगाला जोडण्याची ताकद योग शास्त्रामध्ये आहे, आपण सर्वांनी भारतीय परंपरेने आपल्याला प्राप्त झालेल्या या शास्त्राचा आदर करून, याचे आपल्या दैनंदिन आयुष्यातील महत्त्व ओळखून योग जीवन शैली आपल्या आयुष्यात प्रत्यक्षपणे आणण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे, आणि त्याचा प्रचार आणि प्रसार महत्वाचा भाग असून त्या अनुषंगाने आ. प्रशांत ठाकूर यांच्यासमवेत योग दिन साजरा करण्याचा योग शेकडो जणांनी अनुभवला..!


