नवी मुंबई (पालिका प्रशासन) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोककल्याणकारी केंद्र सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभर महा जनसंपर्क अभियान हाती घेण्यात आले आहे. या अंतर्गत ऐरोली विधानसभा क्षेत्रामध्ये लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली विविध 56 ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.
ऐरोली, रबाळे,घणसोली,कोपरखैरणे, वाशी अशा सर्वच ठिकाणी आणि प्रभाग स्तरावर आयोजित योग दिनामध्ये शेकडो नागरिकांनी भाग घेऊन योगा केला. कोपरखैरणे येथील रा. फ. नाईक विद्यालयाच्या प्रशस्त मैदानामध्ये लोकनेते आमदार गणेश नाईक, ऐरोली विधानसभा क्षेत्राचे प्रथम आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक यांनी भाग घेऊन योगासने केली. येथील आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम अभिनव आणि वैशिष्ट्यपूर्ण ठरला.
या ठिकाणी 999 नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवून योगाचे प्रकार केले. त्यांच्यामध्ये जबरदस्त उत्साह पाहायला मिळाला. सकाळी 9 वाजून 9 मिनिटे आणि 9 सेकंदांनी योग दिनाचा कार्यक्रम सुरू झाला. 9 योगासनाचे विविध प्रकार करण्यात आले. खास करून दिव्यांग विद्यार्थ्यांनी केलेली योगासने सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरली. योगाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या 9 योगा शिक्षकांचा यावेळी लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. पंतप्रधान मोदी यांनी मागील 9 वर्षांमध्ये देशाचा साधलेला विकास आणि विविध जनहिताय योजनांमधून करोडो नागरिकांचे आनंदी, सुखी केलेले जीवन या विषयी माहिती देणाऱ्या एका चित्र प्रदर्शनीचे आयोजन देखील या ठिकाणी करण्यात आले होते. मोठ्या संख्येने नागरिकांनी हे प्रदर्शन पाहिले.
योगाच्या माध्यमातून शांतता आणि समृद्धीसाठी पंतप्रधान मोदींचे कार्य-लोकनेते आ. गणेश नाईक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये देशाच्या नेतृत्वाची धुरा खांद्यावर घेतल्यानंतर याच वर्षी संयुक्त राष्ट्र संघामध्ये योगाला आंतरराष्ट्रीय दिन म्हणून साजरा करण्यासाठी प्रस्ताव दिला होता. तो प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर दरवर्षी 177 देशांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो, अशी माहिती लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी दिली.
देशवासीयांना सुख-सुविधा उपलब्ध करून देतानाच पंतप्रधान मोदी यांनी विविध योजनांच्या माध्यमातून महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, शेतकरी, कामगार आदिवासी, वंचित सर्वच घटकांचे कल्याण साधले आहे. पंतप्रधानांपासून प्रेरणा घेऊन देशातील वैज्ञानिकांनी कोरोना लस निर्माण केली. पंतप्रधानांनी सर्व देशवासीय यांचे लसीकरण करून त्यांना सुरक्षित तर केलेच परंतु अन्य गरजू देशांनाही कोरोना लस उपलब्ध करून भारताची मानवतावादी प्रतिमा आणखी उजळवली. योग प्रचाराच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांचे जागतिक शांतता आणि समृद्धीसाठी मोलाचे कार्य सुरू आहे.

