2–4 minutes

मुंबई (पालिका प्रशासन) : मागाठाणे विधानसभा क्षेत्रात असलेल्या जय महाराष्ट्र नगर येथील संक्रमण शिबीर इमारत १ व ९ मधील रहिवशांना भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या शुभहस्ते घराची चावी वाटप करण्यात आले. सहकार्याची भुमिका घेतल्यानेच हा सोनियाचा दिवस आल्याचे प्रतिपादन यावेळी आ. दरेकर यांनी केले.

यावेळी बोलताना आ. दरेकर म्हणाले की, खरं म्हणजे रहिवाशांनी पहिल्यापासून सहकाराची भुमिका घेतली म्हणून आज सोनियाचा दिवस १ व ९ नंबरच्या आयुष्यात आला आहे. आपण ज्या पद्धतीने पाठपुरावा केला त्यामुळे हा दिवस आला आहे. मी बाहेर जरी फिरत असलो तरी माझे बारीक लक्ष मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाकडे असते. मागाठाणेतील जनतेच्या सुख, दुःखाचा मी रोज विचार करतो. त्यामुळे अनेक प्रकारचे कार्यक्रम, चांगल्या योजना आणतोय. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात जे काही सुख, आनंद देता येईल याचा प्रयत्न करतोय. काही अडीअडचणी राहिल्या असतील तर सरकारच्या माध्यमातून सोडवल्या जातील असा विश्वासही यावेळी दरेकरांनी उपस्थितांना दिला.

ते पुढे म्हणाले की, मी केवळ चावी वाटप कार्यक्रम असल्याकारणाने मुंबईत आलो. मागाठाणेत राहणारा एकही माणूस मागाठाणेतून बाहेर जाणार नाही. आज आपले, तुमचे सरकार आहे. या सरकारला सर्वसामान्य माणसाच्या संवेदना समजतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा नेता सरकारमध्ये आहे. महिन्याभरापूर्वी हौसिंगचे शिबिर घेतले होते. त्या शिबिराला जवळपास १० ते १५ हजार हौसिंग सोसायट्यांचे प्रतिनिधी आले होते. १५ ऐतिहासिक निर्णय त्या शिबिरात झाले. डिम्ड कन्व्हेन्स, सेल्फ डेव्हलपमेंट आपण आणले आहे. हौसिंगसाठी १५ वेगवेगळे निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले आहेत. फडणवीस यांनी सेल्फ डेव्हलपमेंट योजनेला राजाश्रय दिला आहे. त्यामुळे आमचाही आत्मविश्वास वाढला आहे. जेव्हा जनतेच्या भावना, संवेदना समजणारे सरकार असते त्यावेळी कामे होत असतात असेही दरेकर यांनी म्हटले. यावेळी दरेकर यांनी गिरणी कामगारांना मुंबई बँकेतर्फे करण्यात आलेल्याना मदतीची आठवणही उपस्थितांना सांगितली.

दरेकर पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा नेता आपल्या देशाला लाभला आहे. त्यामुळे राजकारणच बदलून गेले आहे. पूर्वी राजकारणात नेत्यांसंदर्भात वेगळे चित्र होते. परंतु अनेक प्रकल्प आहेत की मोदींनी त्या प्रकल्पाचे भूमिपूजन केले आणि त्या प्रकल्पाचे उदघाटनही त्यांच्याच कारकिर्दीत झाले. एखादा प्रकल्प असेल तर तो त्याच कालावधीत पूर्ण झाला पाहिजे, त्याचा लोकांना लाभ झाला पाहिजे, अशा प्रकारची भुमिका घेऊन आज पंतप्रधान मोदी देशात काम करत आहेत. जागतिक स्तरावर देशाचा अभिमान उंचावण्याचे काम ते करत आहेत. अडीच वर्षात सरकार कुणाचे होते. एकेकाळी आम्हीही झेंडा हाती घेतला होता. उद्धव ठाकरेंच्या अडीच वर्षात या महाराष्ट्रातील एक पानही हलले नाही. नाहीतर एकनाथ शिंदे यांना कशासाठी वेगळा विचार करावा लागला असता. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी संघटना काढली. मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झाला. आता कुठेय मराठी माणूस? त्याचा विचार केला नाहीत. मूळ भूमिकेलाच बगल दिली. त्यामुळे शिंदे यांनी उठाव केला आणि शिंदे-फडणवीस सरकार आले. १० महिन्याच्या काळात अनेक निर्णय घेतले. शिंदे-फडणवीस सर्वसामान्यांसाठी प्रामाणिकपणे काम करत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्रीही आहेत. त्यामुळे सहकारी गृहनिर्माणच्या बाबतीत वेगवेगळ्या योजना आणताहेत. लोकांसाठी विचार करणारे नेतृत्व मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस आहेत. सरकार, लोकप्रतिनिधी हे तुमच्यासाठी असतात, असेही दरेकरांनी सांगितले.

याप्रसंगी माजी नगरसेवक प्रकाश दरेकर, विक्रांत चोगले, आप्पा सुर्वे, म्हाडा अधिकारी प्रमोद कांबळे, नगरसेविका आसावरी पाटील, रश्मी भोसले, पत्रकार विजय वैद्य यांसह सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते.

काम माझे, बोर्ड दुसराच लावतो
यावेळी बोलताना दरेकर म्हणाले की, मी केलेल्या कामाची तुम्ही जाणीव ठेवलात त्याबद्धल मनापासून आभार व्यक्त करतो. कारण असे अनेक लोकं आहेत काम झाले की विसरून जातात. काम मी करायचे आणि बोर्ड (बॅनर) दुसराच लावतो, अशी कोपरखळीही दरेकरांनी लगावली.

घर घर अभियानांतर्गत; घरोघरी पत्रके वाटली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला ९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल राज्यभरात ‘मोदी@९’ अभियान सुरू आहे. या अभियानांतर्गत घर घर अभियानद्वारे आ. दरेकर यांनी आज मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन पंतप्रधान मोदींच्या ९ वर्षाच्या कार्याची माहिती देणारी पत्रके वाटली. तसेच यावेळी पत्रकावर दिलेल्या फोन क्रमांकावर मिस कॉल देऊन पंतप्रधान मोदींना समर्थन द्यावे असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले.


Design a site like this with WordPress.com
Get started