प्रतिनिधी (पालिका प्रशासन) : पनवेल महानगरपालिका हद्दीतील मलनि:स्सारण वाहिन्यावरील व पुराचे पाणी येते त्याठिकाणावरील मॅनहोल्सवरील संरक्षक जाळी, मॅनहोल कव्हर बसविण्याची कार्यवाही करण्यासंदर्भात आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १६ जून रोजी शहर अभियंता संजय जगताप आणि उपायुक्त सचिन पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत चारही प्रभाग कार्यालयांमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यकारी अभियंता संजय कटेकर, सहाय्यक आयुक्त डॉ. वैभव विधाते, उपअभियंता सुधीर सांळुखे, घनकचरा व स्वछता विभाग प्रमुख अनिल कोकरे, प्रभाग अधिकारी, कनिष्ठ अभियंता, सर्व स्वच्छता निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, कंत्राटदार, पालिका अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
रस्त्याच्या कडेला असणाऱ्या फुटपाथवरील पावसाचे पाणी वाहून जाणाऱ्या गटारीवरील तसेच पुराचे पाणी वाहून जाणाऱ्या चेंबर्सची झाकणे, मॅनहोलचे झाकणे चुकून उघडी राहिल्यास अनेकवेळा अनुचित प्रकार घडतात, हे अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्यावरती मॅनहोल कव्हर, संरक्षक जाळी बसवण्याबाबत संबधित प्रभागातील कंत्राटदारास या बैठकित सूचना देण्यात आल्या.
मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशान्वये मलनि:स्सारण वाहिन्यावरील मॅनहोलवर संरक्षक जाळी बसविण्याचे तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्यानूसार शहर अभियंता संजय जगताप आणि उपायुक्त सचिन पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये, कामोठे, कळंबोली, खारघर या चारही प्रभागांमध्ये तेथील प्रभाग अधिकारी, कनिष्ठ अभियंता सर्व स्वच्छता निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, कंत्राटदार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकिमध्ये त्या त्या प्रभागातील मॅनहोल्सची संख्या, ठिकाणे याच्यावरती चर्चा करण्यात आली. तसेच मलनिस्सारण, पुराचे पाणी, स्ट्रॉर्म वॉटरवरील महत्वाच्या मॅनहोल्सवरती तातडीने मॅनहोल्स कव्हर, संरक्षक जाळी बसविण्याकरिता कंत्राटदारास चार टिम करून येत्या तीन -चार दिवसात तातडीने हे काम पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
यावेळी प्रभाग अधिकाऱ्यांनी आरोग्य निरीक्षकांसोबत सर्वेक्षण करून मॅनहोल्सवरील माहिती मलनिस्सारण विभाग व बांधकाम विभागास देण्यास सांगितले. जेणे करून येत्या तीन चार दिवसांत हे काम पूर्ण होऊ शकेल. कामांवरती लक्ष ठेवून कंत्राटदारांकडून लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या सूचना बैठकीत कनिष्ठ अभियंत्यास देण्यात आल्या. याचबरोबर महानगर गॅस पाइपलाइनसाठी खोदण्यात आले खड्डे लवकरात लवकर भरण्याच्या सुचना कनिष्ठ अभियंत्यास देण्यात आल्या.

