प्रतिनिधी (पालिका प्रशासन) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारची मागील नऊ वर्षे सेवा , सुशासन आणि गरीब कल्याणाची ठरली आहेत. लोक कल्याणकारी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभर भारतीय जनता पक्षमार्फत ‘मोदी @ 9’ महा जन संपर्क अभियान हाती घेण्यात आले आहे. या अंतर्गत ऐरोली विधानसभा क्षेत्रासाठी लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी लाभार्थी संमेलनाचे आयोजन केले होते. या संमेलनाला सरकारी योजनांच्या असंख्य लाभार्थींची उपस्थिती लाभली.
ऐरोली येथील महाराष्ट्र सेवा संघाच्या सभागृहामध्ये पार पडलेल्या या लाभार्थी संमेलनाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लोकनेते आमदार गणेश नाईक उपस्थित होते. याप्रसंगी, ऐरोली विधानसभा क्षेत्राचे प्रथम आमदार संदीप नाईक, माजी महापौर सुधाकर सोनवणे, माजी स्थायी समिती सभापती अनंत सुतार ,माजी स्थायी समिती सभापती नवीन गवते, भाजपाचे ठाणे लोकसभा विस्तारक अरुण पडते, माजी नगरसेविका दीपा गवते, माजी नगरसेवक अशोक पाटील, माजी नगरसेविका शशिकला सुतार, समाजसेवक राजेश गवते, समाजसेविका एडवोकेट रंजना वानखेडे, समाजसेवक संजय वानखेडे, समाजसेविका एडवोकेट संध्या सावंत, समाजसेविका निवेदिता पोळ, समाजसेवक राजेश मढवी, समाजसेवक निकेतन पाटील, समाजसेवक बापू पोळ, ज्येष्ठ कार्यकर्ते दिनेश पारेख, निकोलस सर, अभिजीत पेडणेकर आदी मान्यवर उपस्थित होते. लाभार्थी मेळावा सुरू होण्यापूर्वी उपस्थितांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रम पाहिला.
केंद्र सरकारच्या योजनांमधून देशातील सर्वच घटकांचे खास करून महिला भगिनींचे जीवन सुखी झाल्याचे लोकनेते आमदार नाईक म्हणाले. घर घर नळ योजना, उज्वला योजना, घर घर शौचालय सारख्या योजनांमधून महिला भगिनींवरचे कष्टाचे ओझे कमी झाले. त्यांचा सन्मान राखला गेला. 94 पेक्षा अधिक लोक कल्याणकारी योजनांनी जनतेच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवले आहेत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामध्ये जगात भारताचा सन्मान वाढला. देश सामर्थ्यवान बनला आहे. भविष्यात भारताला अधिक सामर्थ्यवान करण्यासाठी देशातील जनता नरेंद्र मोदी यांनाच पंतप्रधानपदी निवडून देईल. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जनहिताच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन लोकनेते आमदार नाईक यांनी केले. मोदी सरकारच्या योजना घराघरांमध्ये पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेण्याचा सल्ला त्यांनी दिला.
एडवोकेट रंजना वानखडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना पंतप्रधानांच्या देशसेवेच्या कार्यामध्ये प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे असे मत व्यक्त करताना छोटे छोटे सकारात्मक बदल मोठ्या सकारात्मक बदलाची नांदी ठरतात, असे सांगितले.
अनंत सुतार यांनी देखील उपस्थितांना संबोधित केले. लोकनेते आमदार नाईक यांचे नेतृत्व कार्यकर्त्यांना ऊर्जा प्रदान करते. ही ऊर्जा अखंडपणे कार्यकर्त्यांना कार्यरत ठेवते. पंतप्रधानांनी राबविलेल्या जनहिताच्या योजना यापूर्वीच्या अन्य राजकीय पक्षांच्या सरकारांच्या काळात पाहिल्या नव्हत्या. लोकनेते आमदार नाईक यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे नवी मुंबई प्रथम क्रमांकाचे शहर बनू पाहत आहे.
या संमेलनामध्ये आयुष्यमान हेल्थ कार्ड, ई श्रम कार्ड आणि विविध शासकीय दाखल्यांचे वाटप लोकनेते आमदार नाईक यांच्या शुभहस्ते लाभार्थींना करण्यात आले. महिलांसाठी विनाशुल्क इंग्रजी शिकण्याचे वर्ग आयोजित करणाऱ्या माजी शिक्षिका मनीषा पाटणे आणि मुंबई महापालिकेच्या लेखापरीक्षण विभागातून अलीकडे निवृत्त झालेले सुनील लोखंडे या दोघांचा तसेच दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान लोकनेते आमदार नाईक यांच्या शुभहस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे निवेदन किशोर मोरे यांनी केले तर आभार अरुण पडते यांनी मानले.

