विशेष वृत्त (पालिका प्रशासन) : नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे सातत्याने होणाऱ्या पाणीबंदीमुळे येथील रहिवाश्यांना अचानकपणे उदभवलेल्या पाणीकपात व पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. ज्यामुळे, नागरिकांना आर्थिक त्रासासोबतच मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे. मात्र, अश्याप्रकारे सेवेत कसूर केल्याने उदभवणारी परिस्थिती व त्यामुळे नागरिकांना सहन करावा लागणाऱ्या नाहक त्रासाची जबादारी नक्की कोणत्या अधिकाऱ्याची असावी. असा प्रश्न आता निर्माण होत आहे.
जनतेच्या कररुपी रक्कमेतून खरेदी केलेले ‘मोरबे धरण’, तसेच दरवर्षी या धरण संबंधित असणाऱ्या भोकरपाडा जलशुद्धीकरण प्रकल्प आणि पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या इत्यादींच्या देखभाल दुरुस्तीवर डोळेझाकपणे होणारा करोडोंचा खर्च..! मात्र, तरीही दर तीन ते चार महिन्याला नवी मुंबईकरांना सोसावे लागणारे पाणीकपात व पाणीटंचाईचे चटके अश्या सर्वांचे समीकरण काही जुळून येत नाही. कारण, एवढे करोडो रुपये उधळूनही महापालिकैचा पाणीपुरवठा विभाग नवी मुंबईकरांना तहानलेलाच ठेवणार असेल तर देखभाल-दुरुस्तीवर होणार खर्च नक्की कोणत्या डबक्यात मुरत आहे? याबाबदल चर्चा होणे आवश्यक आहे.
पाणी पुरवठा म्हणले कि, यांत्रिकी अभ्यासातील दबाव आणि गती ह्या मूलभूत बाबींचा समावेश आला. परंतु, जर मोरबे धरण व त्यासंबंधित यांत्रिकी यंत्रणा राबविण्यासाठी त्यातील अभ्यास असणाऱ्याचीच नियुक्ती प्रकल्प अभियंता म्हणून करणे आवश्यक आहे. परंतु, जातीचे समीकरण बसवून आणि आपल्या खुर्चीला धोका नको म्ह्णून, वरिष्ठाकडून ज्येष्ठतेचा टॅग लावून कमशिक्षित आणि कायम परिस्थितीला सामोरे न जाता पळ काढणाऱ्याची नियुक्ती नवी मुंबईकरांना तहानलेला ठेवण्यात कारणीभूत ठरत आहे.
तर, महापालिकेच्या इतर प्रकल्पांबाबतीत घटना घडल्यास संबंधित कार्यकारी अभियंत्यांला पाण्यात बघणारे प्रशासन आणि शहर अभियंता हे मोरबे धरण, ठाणे-बेलापूर रोड आणि सायन्स पार्क प्रकल्पाच्या बाबतीत काहीमात्र घडल्यास सर्वप्रकारची जबाबदारी आणि उत्तरदायित्व स्वत: स्वीकारून ‘त्या’ कार्यकारी अभियंत्याला सुरक्षित ठेवण्यासाठी कायम प्रयत्नशील असतात. हि बाब अनेक शंका-कुशंकांना जन्म देणारी ठरत आहे.
त्यामुळे, नवी मुंबई महापालिकेचे स्व-मालकीचे मोरबे धरण व त्यासंबंधित यंत्रणेच्या देखभाल-दुरुस्तीवर करोडांचा खर्च करूनही, जर का, नवी मुंबईतील नागरिकांना पाणीबंदी व पाणी कपातीला सातत्याने सामोरे जावे लागत असेल तर, यासाठी ‘मोरबे धरण प्रकल्प कार्यकारी अभियंता, शहर अभियंता अथवा महापालिका आयुक्त यांपैकी कोणा एकास जबाबदार धरावे कि, या सर्वांना? अशी मागणी जनतेमध्ये उदयास येत आहे.

