प्रतिनिधी (पालिका प्रशासन) : एकवापरी प्लॅस्टिकचा बहुप्रमाणातील वापर आणि त्यापासून निर्माण होणारे प्रदूषण हे पर्यावरण तसेच मानवी जीवनासाठी अत्यंत घातक असून, प्लॅस्टिकचा वापर कमी करून जमल्यास संपुष्टात आणून निसर्गाचे रक्षण करणे आवश्यक असल्याचे मत ग्रीन वर्क ट्रस्टच्या गार्गी गीध यांनी व्यक्त केले. त्या, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे पनवेल येथील भागूबाई चांगु ठाकूर विधी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना शाखेतर्फे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आयोजित ‘प्लॅस्टिक प्रदूषण नियंत्रणासाठी मानवी प्रयत्न’ विषयावरील कार्यशाळेत बोलत होत्या. याप्रसंगी, प्राचार्या धनश्री कदम, सर्वस्वी सहाय्यक प्राध्यापक डॉ. ममता गोस्वामी, हिमांशू मोरे, भाग्यश्री कांबळे, अपराजिता गुप्ता, सागर देवघरे, राघव शर्मा, ग्रंथपाल जानव्ही भोईर सोबत विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.
पर्यवरणातील जमीन, पाणी आणि हवा इत्यादींचे बहुतांश प्रदूषण हे प्लॅस्टिकमुळे घडून येत आहे. याबाबत, जनजागृती व्हावी आणि विद्यार्थी दशेपासूनच प्लॅस्टिकच्या वापरावर दैनंदिन जीवनशैलीत नियंत्रण आणण्याच्या दृष्टिकोनातून, सदर कार्यशाळेचे आयोजन विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य धनश्री कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी सहा. प्राध्यापक राघव शर्मा यांच्या नियोजनाखाली व सहा. प्राध्यापक हिमांशू मोरे यांच्या विशेष सहकार्याने संपन्न झाले.
याप्रसंगी, महाविद्यालयाच्या सभोवताल भागात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी स्वच्छता अभियान राबवले. ज्यामध्ये, स्वयंसेवकांनी विशेषतः प्लॅस्टिकच्या कचऱ्याचे संकलन केले.


